छत्रपती संभाजीनगर : बीड येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमच्या ताटातले घेऊ नका, असे वक्तव्य केले. तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतही आम्हीही होतो. काही लोकांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे, असे म्हटले. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं? कशाला लोकांच्या काड्या करतात. बीड जिल्ह्यातले मराठ्यांचे लोक आता आणखी शहाणे होतील. तुम्ही मला काय बोलता. आम्हाला ओबीसीचा खायचं तर तू कशाला बंजारा समाजाचे खातो? तू माझ्या नादी लागू नको. शहाणपणा करायचा नाही. तू तिकडे नीट राहायचं. रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलायचे नाही, असे त्यांनी म्हटले.
तुझ्यामुळे मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन....
तू जर इथून पुढे माझ्या नादी लागला तर मी सांगतो मी दोघांचाही बाजार उठवेन. तुझ्यामुळे मी अजित पवारांचा सुद्धा कार्यक्रम लावेन. मी जातीला इतका कट्टर मानणारा आहे की तुम्ही काहीच नाहीत. मी ऐकून घेत आहे म्हणजे शहाणपणा करायचा नाही. तो आता ज्याच्या प्रचाराला येईल ती सीट आता आम्ही पाडतो. मग ते मराठ्यांच्या असले तरी चालेल, असे आव्हान मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिले.
तुम्ही बंजारांचं आरक्षण का घेतले...
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमच्या ताटातले घेऊ नका, याबाबत विचारले असता मनोज जरंगे पाटील म्हणाले की, त्यांना आम्ही मोजत नाही. तुम्ही लोकांच्या ताटातले ओरबाडून खातात आणि तुम्ही लोकांना ज्ञान शिकवत आहात. तुम्ही त्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. वाटोळ करून टाकलं आणि तुम्ही काय दुसऱ्यांना ज्ञान शिकवत आहात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर राजकारणातून नामोनिशान संपवू
धनंजय मुंडे यांनी कट ऑफ लिस्ट देखील सांगितली. ओबीसींची कट ऑफ लिस्ट 485 आहे आणि ईडब्ल्यूएस ची 450 आहे. म्हणजे मी इकनॉमिक विकर सेक्शनमध्ये भरलं असतं तर 450 मध्ये पास झालो असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आल्यानंतर 480 घेतले तरी नापास आहे. मग कुणाला फसवताय? असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले आता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तो किती हुशार आहे ते आम्हाला माहिती आहे. तुला मी पुन्हा एकदा सांगतो तू माझ्या नादी लागू नको. शहाणा असेल तर अजूनही तुझ्या हातातून वेळ गेलेली नाही. तुमच्या दोघांच्या हातून पण अजून वेळ गेलेली नाही. छगन भुजबळचे ऐकून माझ्या आणि माझ्या जातीच्या नादी लागू नका. तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. माझ्या लादी लागाल तर राजकारणातून नामोनिशान संपवू, असा इशारा देखील त्यांनी दिला.